लेखांक- 1
💢 *इयत्ता 10 वी*
*विज्ञान-स्वयंअभ्यास*
प्रिय
विद्यार्थी मित्रहो!
आजपासून आपण इयत्ता 10 वी विज्ञान भाग 2 मधील पहिल्या प्रकरणाचा स्वयं अभ्यास करणार आहोत.
पूर्वतयारी:
■ तुमच्याकडे इयत्ता 10 वी चे विज्ञान भाग 2 चे पुस्तक असणे आवश्यक आहे. हे पुस्तक तुमच्या ताई-दादांकडून मिळवू शकता. किंवा खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही हे पुस्तक डाउनलोड करून घेऊ शकता.
http://cart.ebalbharati.in/BalBooks/ebook.aspx
■ तसेच दिलेले प्रश्न सोडवण्यासाठी एक कच्ची वही लागेल.
चला तर सुरवात करूया *अनुवंशिकता आणि उत्क्रांती* या पहिल्या प्रकरणांपासून.
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वयं अभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
*प्रश्न 1*. खाली तीन स्तंभ देत आहे. तुमच्या वहीत ते एकासमोर एक आखून घ्या. पहिला स्तंभ कायम ठेवून योग्य त्या जोड्या जुळवा.
*स्तंभ अ : शास्त्रज्ञांचे नाव*
1. ग्रेगोर जोहान मेंडेल
2. ह्युगो द रिस
3. वॉल्टर आणि सटन
4. ओसवॉल्ड एव्हरी, मॅकार्थी आणि मॅक्लिऑड
5. फ्रँकॉइस जेकब आणि जॅक मोनॉड
*स्तंभ ब : शोधाचे वर्ष*
A. 1944
B. 1886
C. 1961
D. 1902
E. 1901
*स्तंभ क : शोध*
a. नाकतोड्यातील गुणसूत्राची जोडी पहिली.
b. आधुनिक आनुवंशिकीचा
जनक
c. प्रथिन संश्लेषण प्रक्रियेची प्रतिकृती निर्मिती
d. उपरिवर्तन सिद्धांत
e. DNA हीच आनुवंशिक सामग्री
*सूचना:*
■ सदर जोडी जुळवण्यापूर्वी पुस्तकातील पहिला घटक (पान नं. 1) काळजीपूर्वक वाचा. समजून घ्या. अवघड किंवा न समजलेला शब्द अधोरेखित करून ठेवा. त्याविषयी आपण नंतर चर्चा करू.
लेखांक- 2
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वयं अभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
*आवश्यक पूर्वज्ञान :*
या प्रकरणातील 'प्रथिन संश्लेषण' हा घटक समजून घेण्यासाठी DNA ची रचना माहीत असणे अत्यन्त गरजेचे आहे. त्यासाठी आपणाला इयत्ता 9 वी च्या विज्ञान पुस्तकातील संदर्भ पहावे लागणार आहेत.
तुमच्याकडे इयत्ता 9 वीचे विज्ञान पुस्तक असेलच! त्यातील पान नंबर 181, 182 व 183 वरील मजकुराचे समजपूर्वक वाचन करा. DNA हा घटक दृढ होण्यासाठी खाली काही प्रश्न देत आहे. या प्रश्नांची जर तुम्ही समाधानकारक उत्तरे मिळवलात तर हा महत्वपूर्ण घटक तुम्हाला बऱ्यापैकी समजला आहे असे म्हणावयास हरकत नाही.
चला तर ....
पान क्र. 181 ते 183 पर्यंत खालील प्रश्न डोक्यात ठेवून वाचन करा. त्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीत सुन्दर हस्ताक्षरात लिहून ठेवा.
-----------------------------
■ DNA चे दीर्घ रूप (अर्थ) काय आहे?
■ DNA ला 'केंद्रकाम्ल' असे का म्हणतात?
■ DNA ला 'प्रधानरेणू' असे का म्हणतात?
■ DNA ची रचना खालील मुद्द्यांना धरून स्पष्ट करा.
◆ DNA चा धागा कोणत्या 4 प्रकारच्या नत्रयुक्त रेणूंनी बनलेला असतो.
◆ नत्रयुक्त चार रेणूंचे कोणत्या दोन गटात वर्गीकरण केले आहे?
◆ DNA चे शिडीसारखे दिसणारे दोन खांब कोणत्या दोन घटकांनी बनलेले आहेत?
■ जनुक म्हणजे काय? त्याचे कार्य सांगा.
■ RNA चे कार्यप्रणालीनुसार होणारे तीन प्रकार सांगून प्रत्येकाचे कार्य लिहा.
■ DNA आणि RNA मधील फरक स्पष्ट करा.
लेखांक- 3
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
*अवांतर पण आवश्यक:*
काल आपण DNA आणि RNA ची माहिती समजून घेण्याचा प्रयत्न केला. आज इथे त्याविषयी आणखी थोडे सविस्तर लिहीत आहे.
■ DNA म्हणजे Deoxyribo Nuclic Acid होय.
◆ यात de=deduction म्हणजे कमी होणे किंवा गमावणे. Deoxy म्हणजे ऑक्सिजन गमावणे.
◆ ribo किंवा ribose म्हणजे पंचकार्बनी (पाच कार्बन असणारा) पेंटोज शर्करा रेणू होय.
◆ Nuclic Acid म्हणजे पेशींच्या केंद्रकात (Nucleus मध्ये) आढळणारे आम्ल होय.
यावरून DNA हे पेशींच्या केंद्रकात आढळणारे आम्ल असून ते ऑक्सिजन गमावून तयार झालेल्या पेंटोज शर्करा रेणुपासून बनलेले असते हे तुमच्या लक्षात आले असेल.
🔹 *DNA आणि RNA मधील महत्वाचा फरक:*
1. ही दोन्ही न्यूक्लिओटाईडची बहुवारीके आहेत. DNA मध्ये A,C,G,T आणि RNA मध्ये A,C,G,U हे नत्रयुक्त रेणू असतात. म्हणजे RNA मध्ये थायमिन (T) ऐवजी युरॅसिल (U) असते.
2. DNA केंद्रकात असतात तर RNA पेशींद्रवात आढळतात.
3. DNA दोन खांबानी बनलेला द्विसर्पिल सिडीसारखा असतो. तर RNA एखाच खांबाचा (strand चा) बनलेला असतो.
(सोबत दिलेली आकृती पहा.)
🔹 DNA रेणू पेशींच्या विविध कार्यावर नियंत्रण ठेवते. त्याचप्रमाणे *प्रथिन संश्लेषणामध्ये* सुद्धा महत्वाची भूमिका बजावते.
🔹 *प्रथिन म्हणजे काय?*
प्रथिन हे सजीवांसाठी अत्यावश्यक पोषद्रव्य आहे. सजीवांच्या शरीर बांधणीसाठी विविध प्रकारच्या प्रथिनांची आवश्यकता असते.
🔹 *प्रथिन संश्लेषण म्हणजे काय?*
प्रथिने अमिनो आम्लापासून बनलेली असतात. या अमिनो आम्लाच्या रेणूंची जोडणी होऊन इच्छित प्रथिन तयार होते.
कोणते प्रथिन तयार करायचे आहे?, त्यासाठी कोणती अमिनो आम्ले, कोणत्या क्रमाने जोडायची? हे DNA ठरवतो. म्हणून प्रथिन निर्मितीमध्ये DNA ची भूमिका महत्वाची आहे.
🔹 इ. 10 वी मध्ये आपण प्रथिन संश्लेषण नेमके कसे होते हे शिकणार आहोत. त्यासाठी विज्ञान 2 पुस्तकातील पान नंबर 1 व 2 वरील प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण या तीन टप्प्याचे समजपूर्वक वाचन करा. वाचनानंतर खालील प्रश्नाची उत्तरे वहीत लिहा.
🔹 *प्रश्न:*
◆ प्रथिन निर्मितीविषयी माहिती कुठे साठवलेली असते?
◆ प्रथिन निर्मिती कुणामुळे होते?
◆ mRNA ची निर्मिती कुठे व कशी होते?
◆ प्रतिलेखन म्हणजे काय?
◆ ट्रिपलेट कोडॉन म्हणजे काय?
◆ भाषांतरण म्हणजे काय?
◆ स्थानांतरण म्हणजे काय?
-----------------------------
प्रतिलेखन, भाषांतरण आणि स्थानांतरण या तीन टप्प्यात प्रथिन निर्मिती होते. या तिन्ही क्रिया परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. त्यासाठी हा घटक पुन्हा-पुन्हा वाचून या क्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करा. उद्या आपण आणखी यावर सविस्तर चर्चा करणार आहोत.
लेखांक-4
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
🤔 *आपण काय शिकलो!*
🔹 *प्रतिलेखन (Transcription)*
◆ ही एक प्रकारची मुद्रण क्रिया आहे. ही क्रिया पेशीच्या केंद्रकातील RNA पॉलीमरेज मध्ये पार पाडली जाते. (आकृती 1.1 पहा)
◆ DNA च्या लांब धाग्यात अनेक प्रकारची प्रथिने तयार करण्यासाठी आवश्यक जनुकीय संकेत असतात. जे प्रथिन तयार करावयाचे आहे, त्याचा संकेत असणारा DNA च्या लांब धाग्यातील तेवढाच छोटा भाग RNA पॉलीमरेज मध्ये आणला जातो.
◆ तिथे DNA द्वारे सांकेतिक mRNA चा धागा तयार केला जातो. हा mRNA तयार करण्यासाठी DNA च्या दोन धाग्यापैकी एकाच धाग्याचा वापर केला जातो.
◆ तयार झालेल्या mRNA वर A, C, G हे नत्रयुक्त रेणू आणि थायमिन (T) ऐवजी युरॅसिल (U) असतो.
◆ याप्रकारे DNA पासून mRNA तयार होण्याच्या क्रियेला *"प्रतिलेखन"* असे म्हणतात.
🔹 *भाषांतरण (Translation)*
◆ पेशी केंद्रकात तयार झालेला mRNA चा धागा केंद्रकिय छिद्रातून बाहेर येतो. हा धागा खडबडीत अंतर्द्रव्य जालिका किंवा पेशी द्रवातील *रायबोझोम* मध्ये जातो. थोडक्यात, मेसेंजर RNA चा धागा कोणते प्रथिन तयार करायचे आहे याचा मेसेज (कोडॉन) घेऊन रायबोझोम मध्ये येतो.
◆ रायबोझोम मध्ये mRNA वरील ट्रिप्लेट (तीन-तीन) कोडॉनचा अर्थबोध करून त्याला जुळणारा अँटीकोडॉन tRNA मार्फत पुरवला जातो.
◆ या क्रियेला *'भाषांतरण'* असे म्हणतात.
[लक्षात ठेवा: प्रतिलेखन व भाषांतरण या दोन्ही क्रियांना मिळून *"सेंट्रल डोग्मा"* असे सुद्धा म्हणतात]
🔹 *स्थानांतरण (Translocation)*
◆ प्रत्येक अमिनो आम्लासाठी एक विशिष्ट ट्रिप्लेट कोड असतो.
◆ mRNA वरील ट्रिप्लेट कोडला जुळणारा अँटीकोड tRNA कडे असतो.
◆ भाषांतरण क्रियेत जसजसे tRNA कडून अँटीकोडॉन पुरवले जातात तसतसे mRNA चा धागा रायबोझोमच्या एक टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकू लागतो. mRNA च्या या सरकण्याला *'स्थानांतरण'* असे म्हणतात.
◆ याचवेळी tRNA ने पुरवलेल्या अँटीकोडॉन मुळे अमिनो आम्ल एकापुढे एक जोडले जातात. त्यातून अमिनो आम्लाची पेप्टाईड बंध असणारी शृंखला तयार होते. ही शृंखला म्हणजेच *'प्रथिन'* होय. याप्रमाणे DNA च्या मदतीने पेशीत प्रथिन तयार केले जाते. हे प्रथिन नंतर शरीरातील आवश्यक त्या ठिकाणी पाठवले जाते.
●●●●●●●●●●●●●
🤣 *थोडी गंमत*
【 तुम्ही डॉक्टरकडे जाता. डॉक्टर तुम्हाला औषध लिहून देतात. त्याला 'प्रिस्क्रिप्शन' (चिठ्ठी) म्हणतात. त्यावर कोणते औषध लिहिले आहे ते अक्षर तुम्हाला वाचता येतात का?... नाही. त्याचप्रमाणे डॉक्टर म्हणजे DNA समजू. कोणते प्रथिन तयार करायचे आहे त्यानुसार DNA काही संकेत mRNA वर लिहून देतो. या क्रियेला आपण *ट्रान्सक्रिप्शन* (प्रतिलेखन) असे म्हणू.
आता, ही चिट्टी घेऊन तुम्ही औषध दुकानात जाता. औषध दुकानदारालाच त्या चिठ्ठीचा अर्थबोध होतो. औषध दुकान म्हणजे "रायबोझोम" आणि दुकानदार म्हणजे tRNA आहे असे समजू. तो चिठ्ठीतील संकेतानुसार जुळणारे औषध देतो. या क्रियेला आपण 'भाषांतरण' असे म्हणू.
दुकानदार आता औषधाचे बील प्रिंटरला देतो. छपाई होईल तसे कागद एका टोकाकडून दुसऱ्या टोकाकडे सरकते. या क्रियेला आपण 'स्थानांतरण' म्हणू.
कशी वाटली गंमत! ही फक्त गंमत आहे हं, पेपरमध्ये असं लिहायचं नाही बरं का!!】
-----------------------------
🔹 प्रथिन संश्लेषणाची क्रिया समजावी म्हणून इथे थोडे सविस्तर वर्णन करण्याचा प्रयत्न केला आहे. तरीसुद्धा काहीजणांना अर्थबोध झाला नसेल तर खाली U tube वरील व्हिडिओची एक लिंक देत आहे. व्हिडीओ इंग्रजीमध्ये असला तरी अनिमेशन मुळे नेमके काय घडत आहे हे समजायला तुम्हाला नक्कीच मदत होईल असे वाटते.
व्हिडीओ पाहण्यासाठी खालील लिंकवर टिचकी मारा.
https://youtu.be/2BwWavExcFI
-----------------------------
🔹 *आजचा अभ्यास:*
पान नंबर 2 वरील तिसरा परिच्छेद वाचून खालील प्रश्नांची उत्तरे मिळवा आणि तुमच्या वहीत लिहा.
1) जनुका मध्ये अचानक घडून आलेल्या बदलाला काय म्हणतात.
2) जनुकीय बदलाचे सजीवावर कोणते परिणाम होतात? का?
लेखांक-5
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
*चला चर्चा करूया!*
या स्व:अभ्यासामध्ये रोज मी तुम्हाला काही प्रश्ने लिहिण्यासाठी देत असतो. पाठयपुस्तकात त्याची उत्तरे असल्यामुळे तुम्ही ती शोधून लिहीत असालच! या शोधण्यातच तुमचा अर्धा अभ्यास होत असतो. त्यामुळे दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे व लिहिणे स्वअभ्यासामध्ये अत्यन्त महत्वाचे आहे. हे काम तुम्ही जेवढ्या प्रामाणिकपणे कराल, तेवढे तुम्हाला परीक्षेत चांगले फळ मिळणार आहे.
आज सुद्धा मी तुम्हाला काही प्रश्न देणार आहे. *मात्र यांची उत्तरे लिहायची नसून फक्त चर्चा करायची आहेत.* थोडक्यात, गप्पा मारायच्या आहेत. ही चर्चा तुम्ही घरातील जेष्ठ मंडळी, आई-वडील, दादा-दीदी यांच्याबरोबर करू शकता. अगदी नातेवाईकांना फोनवरून विचारू शकता.
चर्चेची सुरवात कुठून करायची आणि ती योग्य दिशेने पुढे कशी न्यायची यासाठी तुम्हाला तुमचे कौशल्य वापरावे लागणार आहे. तुम्हाला मदत व्हावी म्हणून मी काही नमुना वजा प्रश्न/मुद्दे खाली देत आहे. त्याचा चर्चेवेळी उपयोग करा. पण आज चर्चा करायचीच आहे हे लक्षात ठेवा. कारण आजची चर्चा उद्याच्या घटकांची पायाभरणी ठरणार आहे. चला तर मग ...
*प्रश्न/मुद्दे*
■ आपली पृथ्वी कशी निर्माण झाली असावी?
■ सजीवांचे अस्तित्व फक्त पृथ्वीवर आहे, की विश्वात अन्यत्र कोठे आहे?
■ या पृथ्वीवर जीवनाचा उगम कसा झाला असावा? जर तो एकाच जनक जीवापासून झाला असेल तर, मग त्यांच्यात एवढी विविधता कशी?
■ या पृथ्वीवर आधीपासूनच जीव होते, की ते अन्य ग्रहावरून किंवा बाहेरून आले असावेत?
■ मानव या पृथ्वीवर आधीपासून होता, की तो इथे वास्तव्य करण्यासाठी बाहेरून आला?
वरील सर्व प्रश्न गहन आहेत. अनंत काळापासून ते मानवाला छळत आहेत. या प्रश्नाची उत्तरे शोधण्याच्या जिज्ञासेतून मानवाचा आजचा विकास झाला आहे. म्हणून तुमचे समाधान होईपर्यंत तुम्ही या प्रश्नांचा पाठलाग सोडू नका. खोदून-खोदून प्रश्न विचारा. चर्चा करा. गप्पा मारा. जाणून घ्या.
तुम्हाला शुभेच्छा!
याच विषयावर गप्पा मारण्यासाठी उद्या पुन्हा भेटूया!
लेखांक-6
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
कालची चर्चा चांगलीच रंगली असणार? खूप प्रश्न अनुत्तरित सुद्धा राहिले असतील. हरकत नाही. आज आपण त्यानुषंगाने आणखी माहिती घेऊ.
पृथ्वी किंवा या समस्त विश्वाची उत्पत्ती कशी झाली असावी हे जाणून घेण्याची जिज्ञासा मानवाला प्राचीन काळापासून आहे. त्यातूनच अनेक विचारवंत आणि दार्शनिकांनी आपल्या परीने याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्या सुव्यवस्थित मांडणी केलेल्या मताला 'सिद्धांत' असे म्हणतात.
🔹 पृथ्वी किंवा विश्वाच्या उत्पत्ती बाबत प्राचीन काळापासून साधारण खालील प्रमाणे सिद्धांत मांडले गेले आहेत.
◆ पृथ्वी सपाट आहे.
◆ पृथ्वी विश्वाचा मध्य आहे.
◆ सूर्य विश्वाचा मध्य आहे.
◆ आकाशगंगा विश्वाचा मध्य आहे.
◆ *बिग बँग अर्थात महाविस्फोट सिद्धांत*
यातील बिग बँग सिद्धांत शास्त्रीय व सर्वमान्य आहे.
🔹 त्याचप्रमाणे या पृथ्वीवर सजीवांची उत्पत्ती किंवा सृष्टीची निर्मिती कशी झाली याबाबत सुद्धा विविध सिद्धांत मांडले गेले आहेत.
◆ जगातील सर्वात प्राचीन हिंदू धर्मातील वेद व उपनिषदात सृष्टीची उत्पत्ती ब्रम्हापासून झाली आहे असे सांगितले आहे.
◆ ख्रिश्चन व मुस्लिम धर्माच्या मूळ यहुदी धर्म ग्रंथानुसार *अदम आणि इव्ह* सर्वप्रथम स्वर्गातून पृथ्वीवर आले असे सांगितले आहे. म्हणजे सृष्टी सुरवातीपासून अस्तित्वात होती मानव नंतर आला असे हे मत आहे.
डॉ. सुरेशचंद्र नाडकर्णी लिखित *'पृथ्वीवर माणूस उपराच'* या पुस्तकात देखील साधारण असेच मत मांडले आहे. (शालेय ग्रंथालयातील हे पुस्तक मिळवून वाचा.)
◆ सृष्टीच्या निर्मितीबद्दल यासारखीअनेक मिथके व उपपत्ती ग्रीक, रोमन, चिनी संस्कृतीमध्ये आढळतात.
मात्र वैज्ञानिक दृष्टया अभ्यास केलेला आणि सर्वमान्य सिद्धांत म्हणजे *'सजीवांची उत्क्रांती' किंवा 'सजीवांचा क्रमविकास'* हा होय. आपण पाठयपुस्तकात याच वैज्ञानिक सिद्धांताचा सविस्तर अभ्यास करणार आहोत.
-----------------------------
*आजचे स्वअभ्यासचे प्रश्न*
(पाठ्यपुस्तकातील पृष्ठ क्र. 3 वरील मजकूर समजपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नाची उत्तरे लिहा.)
1) उत्क्रांती म्हणजे काय? विविध व्याख्या लिहा.
2) प्राचीन पेशी कसा तयार झाला असावा?
3) उत्क्रांतीचा सिद्धांत थोडक्यात लिहा.
लेखांक- 7
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
काल दिलेल्या स्वाध्यायातील 'उत्क्रांती' ची व्याख्या तुम्ही लिहिलात का? उत्क्रांती या शब्दाच्या विविध व्याख्या आहेत. त्यापैकी दोन व्याख्या पुस्तकात दिल्या आहेत. व्याख्येवरून शब्दार्थ समजतो. उत्क्रांती या शब्दाचा तुम्हाला विग्रह करता येईल का? ......
🔹 *उत+क्रांती=उत्क्रांती*
यातील उत म्हणजे वरची दिशा, प्रगती, विकास आणि क्रांती म्हणजे बदल. म्हणून उत्क्रांती म्हणजे भिन्न रचना आणि कार्य असलेल्या पूर्वजांपासून वनस्पती व प्राण्यांचा झालेला प्रागतिक विकास होय.
🔹 *उत्क्रांतीचा सिद्धांत* सर्वमान्य का झाला असेल?
उत्क्रांती संदर्भात मांडलेल्या अनेक सिद्धांतात काही ना काही तथ्य असेल, नाही असे नाही! परंतु सर्व सिद्धांत स्वीकारले गेले नाहीत. विशेषतः धार्मिक मान्यता आणि मिथके नाकारण्यात आले. कारण जे सिद्धांत काळाच्या ओघात, शास्त्रीय कसोटीवर टिकले त्यांचाच स्वीकार झाला आहे. एखाद्या सिद्धांताला लोकमान्यता लाभण्यासाठी सिद्धांताच्या पुष्ठ्यर्थ विश्वसनीय व सबळ पुरावे असणे गरजेचे असते. त्यातून नवनवीन संशोधनाला वाव मिळायला पाहिजे. या सर्व कसोटीवर *'चार्ल्स डार्विन'* यांनी मांडलेला 'उत्क्रांतीचा सिद्धांत' टिकतो. म्हणून आपल्या पाठयपुस्तकात या सिद्धांता विषयी सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
🔹 *उत्क्रांतीच्या अभ्यासाचे महत्व*
पाठयपुस्तकातून उत्क्रांतीचा अभ्यास आपण का करायचा? उत्क्रांतीच्या अभ्यासातून आपल्याला कोणता फायदा झाला आहे? याचा जरा विचार करू.
◆ एकपेशीय सजीवापासून ही समस्त सृष्टी विकसित झाली असा डार्विनचा सिद्धांत सांगतो. अर्थात हे घडण्यासाठी करोडो वर्षे लागली आहेत. असे बदल आपण पाहू शकत नाही. कारण सजीवांमध्ये काळाच्या ओघात झालेले बदल पहावयाचे असतील तर त्यांच्या हजारो पिढ्यांचा अभ्यास करावा लागेल. तेवढे आयुष्य आपल्याकडे नाही. म्हणून संशोधकानी अभ्यासासाठी अल्पायु असणाऱ्या सुक्ष्मजीवांची निवड केली आहे.
सूक्ष्मजीवांच्या अभ्यासातून दर पिढीगणिक ते कसे उत्क्रांत होत गेले आहेत आणि सक्षम जीवच कसे टिकाव धरतात हे सप्रमाण सिद्ध झाले आहे.
उदाहरण द्यायचे झाले तर SARS (स्वाइन फ्लू) चा विषाणू, HIV एड्स चा विषाणू आणि सध्या गाजत असलेला कोविड-19 विषाणू यांचे देता येईल.
हे विषाणू उत्क्रांत झाले आहेत आणि जुनी औषधे त्यांच्यापुढे निष्प्रभ ठरत आहेत.
दुसरे उदाहरण लसीकरणाचे देता येईल. काळानुसार जुन्या लसी निष्प्रभ होत असून नवीन लसी शोधावे लागत आहेत. त्याचप्रमाणे प्रतिजैविकांचेही झाले आहे. जर आम्ही उत्क्रांतीचा शास्त्रीय अभ्यास केला नसता तर या उत्क्रांत जिवाणू आणि विषाणू बरोबर कसे लढलो असतो? ......
🔹 *सजीवांचा क्रमविकास झाला आहे हे सिद्ध करण्यासाठी कोणते पुरावे उपलब्ध आहेत?*
या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी पुस्तकातील चौथे पृष्ठ पहा. दिलेली माहिती समजपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या रिक्त जागा भरा. हाच तुमचा *आजचा स्वाध्याय....*
-----------------------------
🔹 *बाह्यरूपीय पुरावे*
(म्हणजे बाह्यरूप कसे आहे?)
अ] चित्रात दिलेल्या तीन प्राण्यांची नावे
1…...... 2......... 3........
◆ आढळलेली समान वैशिष्ट्ये
1…...... 2......... 3........
ब] चित्रात दिलेल्या तीन वनस्पतींची नावे
1…...... 2......... 3........
◆ आढळलेली समान वैशिष्ट्ये
1…...... 2......... 3........
◆ यावरून काय सूचित होते?
..........….......
🔹 *शरीरशास्त्रीय पुरावे*
◆ चित्रात दिलेले प्राण्यांचे अवयव
1…...... 2......... 3.........4........
◆ कोणत्याबाबतीत साम्य दिसून येते?
1…...........2 ..............
◆ यावरून काय सूचित होते?
..........….......
लेखांक-8
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
🔹 *कार्बनी वयमापन*
■ एखाद्या पुरातन अवशेषातील किरणोत्सारी कार्बनचे प्रमाण मोजून त्याचे वय निश्चित करण्याच्या पद्धतीला 'कार्बनी वयमापन' असे म्हणतात.
■ ही पद्धत नैसर्गिक कार्बन C-14 च्या क्षयावर आधारलेली असून *विलार्ड लिबी* यांनी 1954 मध्ये ती विकसित केली.
■ कार्बनचे अनेक अपरूपे आहेत. त्यापैकी C-12 आणि C-14 ही अपरूपे सजीवात समप्रमाणात आढळतात. यापैकी C-14 हे अपरूप किरणोत्सारी आहे.
■ जेव्हा प्राणी अथवा वनस्पती मृत पावतात तेव्हा त्यांचे कार्बन (अन्न) ग्रहण थांबते व त्या क्षणापासून त्यांच्या शरीरातील फक्त C-14 चा ऱ्हास होण्याची एकच प्रक्रिया चालू राहते. त्यामुळे काळानुसार सजीवांच्या शरीरातील C-12 आणि C-14 चे गुणोत्तर सतत बदलत राहते.
■ सजीवाच्या शरीरातील C-14 आणि C-12 व C-14 चे गुणोत्तर यावरून तो सजीव किती वर्षापूर्वी जीवंत होता म्हणजेच त्याचा काल निश्चित केला जातो.
■ या पद्धतीचा उपयोग पुरातन अवशेषशास्त्र व मानववंशशास्त्र यामध्ये मानवी अवशेष, जीवाश्म किंवा हस्तलिखिताचे वय/काल ठरवण्यासाठी होतो.
■ उत्क्रांतीचा अभ्यास करण्यामध्ये या पद्धतीने मोठा हातभार लावला आहे. कार्बनी वयमापन पद्धतीनुसार अपृष्ठवंशीय प्राण्यांपासून हळूहळू पृष्ठवंशीय प्राण्यांचा उद्भव झालेले दिसून आले आहे.
🔹 *थोडे स्पष्टीकरण:*
◆ C-12 आणि C-14 यामध्ये 12 आणि 14 हे अंक कार्बनचे अणूवस्तुमान दर्शवतात.
◆ C-14 चा अर्धआयुकाल 5730 वर्षे आहे. म्हणजे एखाद्या मृत अवशेषातील C-14 चे ऱ्हास होऊन त्याची संख्या निम्मी होण्यासाठी 5730 वर्षे लागतात.
◆ हे एका उदाहरणाने समजून घेऊ. समजा एका मृत सजीवाच्या शरीरात C-12 चे 20 आणि C-14 चे 10 अणू आहेत. म्हणजे C-14 ची संख्या अर्ध्याने कमी झाली आहे. याचा अर्थ तो सजीव 5730 वर्षापूर्वी जिवंत होता. याप्रमाणे कोणत्याही मृत अवशेषातील C-12 आणि C-14 चे गुणोत्तर पाहून त्याचे वय/काल निश्चित करता येते.
◆ सर्वात प्रथम इजिप्त मधील प्राचीन लाकडी खेळण्याचे याप्रमाणे वय निश्चित करण्यात आले होते.
----------------★★★ --------------------
🔹 *आजचा स्वाध्याय*
आजचा स्वाध्याय सोडवण्यासाठी पाठयपुस्तकातील पृष्ठ क्र. 5 व 6 वरील मजकुराचे समजपूर्वक वाचन करा.
1. अवशेषांग म्हणजे काय?
2. सजीवाच्या शरीरात अवशेषांग का निर्माण होतात?
3. खालील रिक्त जागा भरा.
खाली मानवी शरीरात असणारे पण मानवाला निरुपयोगी अवशेषांगाची नावे दिली आहेत. त्यांच्यापुढे ती कोणत्या प्राण्यांसाठी उपयुक्त आहेत ते लिहा.
A) आंत्रपुच्छ : ...........
B) कानाचे स्नायू : .........
C) माकडहाड : ..........
D) अक्कलदाढ : ...........
E) अंगावरील केस : ..........
4. जीवाश्म म्हणजे काय?
5. पुस्तकातील आकृती 1.8 चे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
a) पुराजीव महाकल्प मध्ये कोणत्या सजीवांचे अवशेष आढळतात?
b) माध्यजीव महाकल्प मध्ये कोणत्या सजीवांचे अवशेष आढळतात?
c) नूतनजीव महाकल्प मध्ये कोणत्या सजीवांचे अवशेष आढळतात?
d) भूस्तर रचनेत आढळणाऱ्या जीवाश्मवरून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल?
लेखांक- 9
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
*डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत*
"ओरीजीन ऑफ स्पेसीज" या आपल्या पुस्तकात डार्विनने नैसर्गिक निवडीच्या सिद्धांता बाबत खालील प्रमाणे स्पष्टीकरण दिले आहे.
■ *जलद गुणाकार:*
सर्व सजीव प्रचंड संख्येने पुनरुत्पादन करतात.
■ *जगण्यासाठी संघर्ष:*
हे सर्व जीव एकमेकांशी जीवघेणी स्पर्धा करतात. या स्पर्धेत जो जीव जिंकण्यासाठी आवश्यक गुणधर्म दाखवतो तोच तगून राहतो.
■ *सक्षम ते जगातील:*
या जीवघेण्या स्पर्धेत नैसर्गिक निवडही महत्वाची ठरते कारण निसर्गाला जुळवून घेणारे सुयोग्य जीवच जगतात. बाकीचे मरतात.
■ *विविधता:*
जगलेले जीव पुनरुत्पादन करू शकतात व आपल्या वेगळ्या वैशिष्टयासह नवीन प्रजाती तयार करतात.
■ *आक्षेप:*
डार्विनचा नैसर्गिक निवडीचा सिद्धांत बऱ्याच काळापर्यंत सर्वमान्य राहिला आहे. मात्र त्यातील काही बाबींवर आक्षेप घेतले आहेत. त्यातील महत्वाचे आक्षेप म्हणजे
# नैसर्गिक निवड ही एकमेव गोष्ट उत्क्रांतीला कारणीभूत नाही.
# उपयोगी आणि निरुपयोगी बदलाचे स्पष्टीकरण डार्विनने दिले नाही.
# सावकाश व एकदम होणारे बदल यांचा उल्लेख केलेला नाही.
असे आक्षेप असले तरी डार्विनने उत्क्रांती बाबत केलेले कार्य हे एक "मैलाचा दगड" ठरले आहे.
★★★
*आजचा स्वाध्याय*
पाठयपुस्तकातील पृष्ठ क्र. 5 व 6 चे समजपूर्वक वाचन करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
प्रश्न 1. 'जोडणारे दुवे' म्हणजे काय?
प्रश्न 2. खालील प्राण्यांची विशेष वैशिष्टये लिहा.
a) डकबिल प्लॅटिपस
b) लाँगफिश
c) पेरीपेटस
d) या प्राण्यांच्या विशेष वैशिष्ट्यावरून कोणता निष्कर्ष काढाल?
प्रश्न 3 आकृती क्र. 1.10 मध्ये दिलेल्या प्राण्यांच्या विविध अवस्थामधील भ्रूणांच्या वाढीचा तुलनात्मक अभ्यास करून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल?
लेखांक-🔟
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
*आजचा स्वाध्याय*
विद्यार्थी मित्रहो,
पाठयपुस्तकातील पृष्ठ क्र. 8 वरील मजकूर समजपूर्वक वाचा आणि खालील प्रश्नांची उत्तरे लिहा.
1. इंद्रियांचा वापर व न वापराचा सिद्धांत लिहा.
2. मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत स्पष्ट करणारी उदाहरणे लिहा.
3. संपादित गुणांचा अनुवंश म्हणजे काय?
4. लॅमार्कवाद का नाकारण्यात आला?
--------------------------------------
■ *कांही मजेशीर तथ्ये*
◆ लॅमार्कचा मिळवलेल्या गुणांच्या संक्रमणाचा सिद्धांत पडताळून पाहण्यासाठी जीवशास्त्रज्ञ ऑगस्ट विस्मन यांनी उंदरावर प्रयोग केले. सुमारे 21 पिढीपर्यंत त्यांनी उंदरांची शेपूट कापली. परंतु प्रत्येक पिढीत मागील पिढ्या सारखीच शेपूट असणारे उंदीर जन्माला आले. शेपूट गायब किंवा छोटी झाली नाही. यावरून कायिक पेशीत झालेले बदल पुढील पिढीत संक्रमित होत नाहीत हे त्यांनी सप्रयोग दाखवून दिले.
◆ भारतीय संस्कृतीमध्ये प्राचीन काळापासून स्त्रीयांच्या नाक आणि कानाच्या पाळीला छिद्र पाडण्याची पद्धत आहे. मात्र नवजात बालकाच्या नाक व कानाच्या पाळीला छिद्र नसतात.
◆ लॅमार्कच्या सिद्धांताचा प्रभाव तत्कालीन तत्वज्ञ कार्ल मार्क्स आणि सोवियत रशियाच्या कम्युनिस्ट सरकारवर होता. समाज सुधारणेसाठी हा सिद्धांत त्यांना शास्त्रीय आधार वाटत होता.
लेखांक-11
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
*आजचा स्वाध्याय*
विद्यार्थी मित्रहो,
आज फक्त स्वाध्याय देणार आहे. तो सोडवण्यासाठी तुम्हाला पाठयपुस्तकातील पृष्ठ क्र. 9 आणि 10 ची मदत घ्यावी लागेल. इथे समोरासमोर दोन स्तंभ देऊ शकत नाही. परंतु तुम्ही वहीत 'अ' आणि 'ब' असे समोरासमोर दोन स्तंभ आखून घ्या आणि जोड्या जुळवा.
-----------------------------
*प्रश्न :*
मानवी उत्क्रांतीच्या काल पटावर आधारित
*जोडी जुळवा*
स्तंभ अ) *'.... वर्षांपूर्वी '*
1) 7 कोटी
2) 4 कोटी
3) 2 कोटी 50 लाख
4) 2 कोटी
5) 40 लाख
6) 20 लाख
7) 15 लाख
8) 50 हजार
9) 10 हजार
10) 5 हजार
11) 400
12) 200
स्तंभ ब) *'महत्वाची घटना'*
a) आधुनिक शास्त्राचा उदय
b) संस्कृतीचा विकास झाला
c) कुशल मानव तयार झाला.
d) औद्योगिकीकरणाला सुरवात
e) बुद्धिमान मानव
f) द. आफिकेत एप चा विकास
g) मानव सदृश्य अस्तित्वात आला.
h) लिहिण्याच्या कलेचा शोध
i) डायनोसॉर नाहीसे झाले.
j) माकडाचे शेपूट नाहीसे झाले.
k) चिम्पाझी व गोरीलाचा उदय
L) ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास
आजच्या स्वाध्यायाच्या अनुषंगाने उद्या आपण सविस्तर चर्चा करूया.
लेखांक- 12
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
*फक्त वाचा व चिंतन करा*
■ *बिग बँगच्या सिद्धांतानुसार* विज्ञान आपल्याला सांगते की, अगणित सूर्यानी बनलेल्या आपल्या विश्वाचे वय सुमारे तेराशे कोटी वर्षे असून, त्यात आपला सूर्य सुमारे फक्त ५०० कोटी वर्षांपूर्वी निर्माण झालेला आहे.
■ त्यानंतर म्हणजे सुमारे ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीच्या जन्मदात्या हय़ा सूर्यापासून आपली पृथ्वी बनलेली आहे, पण तेव्हा ती एक अतिउष्ण जळता गोळा होती. ती थंड आणि जलमय व्हायला सुमारे शे-सव्वाशे कोटी वर्षे लागली. *सुमारे साडेतीन अब्ज वर्षांपूर्वी पृथ्वीवर कोणत्याच प्रकारचे जीवन अस्तित्वात नव्हते.*
■ नंतर केव्हा तरी म्हणजे सुमारे तीन-साडेतीनशे कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीवर कुठे तरी काही रासायनिक प्रक्रिया निसर्गत: होऊन आधी (अल्गी) शेवाळ व नंतर केव्हा तरी अगदी साधे अमिबा, बॅक्टेरियासारखे जिवाणू किंवा एकपेशी सजीव निर्माण झाले.
■ नंतरची सुमारे दोनशे कोटी वर्षे पृथ्वीवर फक्त असलेच प्राथमिक अवस्थेतील सजीव होते. तेव्हा आजच्यासारखी जंगले किंवा पशू-पक्षीसुद्धा पृथ्वीवर नव्हते.
■ नंतर सुमारे साठ कोटी वर्षांपूर्वीपासून सुमारे वीस कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर बहुपेशीय पण कमी गुंतागुंतीची शरीरे असलेल्या सजीवांचे ‘प्राचीन जीवयुग’ होऊन गेले. त्यालाच आपण *पुराजीव महाकल्प* असे संबोधले आहे.
■ पुढे वीस कोटी वर्षांपूर्वीपासून ते पाच कोटी वर्षांपूर्वीपर्यंत पृथ्वीवर सरपटणारे प्राणी व वेगवेगळे डायनॉसॉर आणि अनेक वनस्पती वगैरेंचे 'मध्यजीवयुग’ होऊन गेले. याला आपण *मध्यजीव महाकल्प* असे संबोधले आहे. याचदरम्यान सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचे डायनोसॉर नाहीसे झाले.
■ त्यानंतर हय़ा शेवटच्या पाच कोटी वर्षांपूर्वी आज जगात दिसणाऱ्या सस्तन प्राण्यांचे ‘नवजीवयुग’ म्हणजेच *नवजीव महाकल्प* सुरू झाले.
■ हय़ाच नवजीवयुगात सुमारे चारकोटी वर्षांपूर्वी, मानवाचा पूर्वज असलेला बिनशेपटीचा, चतुष्पाद असलेला, पण दोन पायांवर चालण्याचा प्रयत्न करू लागलेला ‘मानव-पूर्वज-मर्कट’ पृथ्वीवर वावरत होता. हय़ाचे पुरावे शास्त्रज्ञांनी केलेल्या उत्खननात मिळालेले आहेत.
हीच वन्यप्राणी असलेली मर्कट जात शेवटची एक सव्वा कोटी वर्षे उत्क्रांत होत राहिलेली आहे. ती जात मागील दोन पायांवर, पण जरा पुढे वाकून चालू लागली व पुढील दोन पायांचा हातासारखा उपयोग करू लागली. उदाहरणार्थ, झाडावर चढताना फांद्या धरायला, जमीन खरवडून कंदमुळे खाण्यासाठी काढायला किंवा बीळ खणून लहानसहान प्राणी पकडून खायला किंवा झाडांच्या फांद्यांचा वा प्राण्यांच्या हाडांचा काठीसारखा हत्यार म्हणून उपयोग करायला वगैरे. हय़ा *उत्क्रांतीत त्याला निसर्गनियमाने तीन महत्त्वपूर्ण गोष्टी प्राप्त झाल्या.* एक म्हणजे हाताचा आकार बदलला व एका बोटाचा अंगठा बनला, जो इतर बोटांना टेकवता येऊ लागला. *दुसरे* म्हणजे कंठ थोडा उत्क्रांत होऊन तो वेगवेगळे आवाज काढू लागला. ज्यातून पुढे ‘काही शब्द’ आणि नंतर ‘भाषा’ निर्माण झाली व *तिसरे* म्हणजे हाताने अन्नाचे लहान तुकडे करून खाणे शक्य झाल्यावर, त्याला मोठय़ा जबडय़ाची गरज उरली नाही, त्यामुळे जबडा लहान होऊ लागल्याने डोक्यात मेंदूची वाढ व्हायला जागा निर्माण झाली व तशी मेंदूची वाढ क्रमश: होऊ लागली.
■ नंतर अवघ्या दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी हय़ा *ऑस्ट्रेलोपिथिकस आणि रामापिथिकस किंवा ज्याला दाक्षिणात्य वानर* असेही म्हणतात, त्याच्यापासून दोन पायांवर सरळ ताठ चालू शकणारा आदिमानव *(होमो इरेक्टस)* निर्माण झाला आणि
■ त्यानंतर आजपासून अवघ्या दीड-दोन लाख वर्षांपूर्वी ‘होमो सॅपियन’ ऊर्फ ‘शहाणा मानव’ ही आजची मानवजात निर्माण झालेली आहे व त्याचीही उत्क्रांती होतच आहे. आदिमानव असतानाच तो हाताने दगडांपासून साधीसुधी हत्यारे बनवायला शिकला. जंगलात किंवा उघडय़ावर एकटय़ादुकटय़ाने स्वसंरक्षण करून राहण्यापेक्षा तो माणसांच्या टोळ्या व नंतर संघसमाज बनवू लागला, घरे बांधू लागला, समाजात एकमेकांशी संवाद साधण्यासाठी त्याच्या आवाजाचे काही शब्द व हळूहळू त्याची भाषा बनू लागली. सर्वात महत्त्वाची गोष्ट ही की त्याचा मेंदू वाढू शकल्याने तो विचार करू लागला. भाषा आणि मेंदू एकमेका साहाय्य करू लागले. स्मृती वाढली, विचार वाढले, आता काय झाले पाहा. मूलत: वन्य -प्राणी असलेला आदिमानव, उत्क्रांतीच्या त्याच्या पुढच्या पायरीवर तो आता स्वत:च्या हाताने स्वत:च आपली हत्यारे बनवू शकणारा, विचार करू शकणारा, एकमेकांशी गुंतागुतीचे संवाद भाषेद्वारे करू शकणारा, स्वत:ची घरे बांधू शकणारा, पशुपालन करणारा व नंतर मानवरूपात येऊन काही हजार वर्षे जीवन जगल्यावर
शेवटच्या दहा-बारा हजार वर्षांत शेती करून धान्योत्पादन करून ते साठवूनही ठेवू शकणारा, *हुशार मानव* बनला.
■ हय़ा इतक्या कुवती प्राप्त झाल्यामुळे ही द्विपाद मनुष्यजात पृथ्वीवरील इतर सर्व पशू-पक्ष्यांशिवाय वरचढ ठरली, समर्थ ठरली. बिनशेपटीच्या एका मर्कट जातीपासून अनेक टप्प्यांनी अखेर आजची बुद्धिमान, शहाणी, कुशल व सुसंस्कृत मानवजात बनायला त्याला एक-सव्वा कोटी वर्षांचा दीर्घ काळ मात्र घ्यावा लागला हे खरे.
■ याचा अर्थ असा होतो की ४६० कोटी वर्षांपूर्वी पृथ्वी निर्माण झाल्यापासून, सुमारे ४५९ कोटी वर्षेपर्यंत मानवच नव्हे तर मानवाचा कुणी पूर्वजही पृथ्वीवर नव्हता. म्हणजे मानव नवागत आहे, आदिमानवरूपात अवघ्या दहा-पंधरा लाख वर्षांपूर्वी व शहाण्या मानवरूपात तो पृथ्वीवर अवघ्या दीड-दोन लाख वर्षांपूर्वी आलेला आहे.
■ मानव पृथ्वीवर विकसित झाला की बाहेरून आला हा आजही चर्चेचा विषय आहे. तरीही आपण आधुनिक वैज्ञानि क साधनांच्या सहाय्याने मानववंशाच्या मुळांच्या तपशिलाचा शोध घेतच आहोत.
■■■
आज स्वाध्याय नाही. मात्र या माहितीच्या अनुषंगाने घरी चर्चा करा.
लेखांक- 13
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
*वर्गाध्यापन करताना काही विद्यार्थी शिक्षकांना- लेम्यूर म्हणजे काय? गिबन म्हणजे काय? ओरँग उटान म्हणजे काय? अशी प्रश्ने विचारतात. अशा जिज्ञासू विद्यार्थ्यांसाठी थोडी सविस्तर माहिती ...*
🔹 *लेम्यूर*
(पृष्ठ क्र.9 ओळ क्र.11)
आफ्रिकेच्या आग्नेय किनाऱ्यावरील मादागास्कर या विशाल बेटावर लेम्यूर माकड आढळते. शास्त्रज्ञांनी 18 व्या शतकात सर्वप्रथम हा सस्तन प्राणी पाहिला. रात्रीच्या वेळी झाडावरून फिरताना हा प्राणी त्यांच्या बटबटीत मोठ्या डोळ्यांमुळे जणू भूतासारखा भासतो. म्हणून त्याला 'लेमरस' हे नाव पडले. लॅटिन भाषेत लेमरस म्हणजे 'भूत'. पुढे जाऊन त्याचे ' लेमुर्स' हे नाव रूढ झाले. लेमुर्स हे माकडाचे पूर्वज असावेत असे मत संशोधक मांडतात. आजही लेम्यूर माकडाच्या सुमारे 32 जाती अस्तित्वात आहेत.
■ *कपि कुल:*
लेम्यूर पासून माकडे विकसित झाली असावीत. लाल-काळी माकडे आपणाला माहीत आहेत. सुमारे 4 कोटी वर्षांपूर्वी या माकडांची शेपूट हळूहळू नाहीशी झाली आणि त्यांचे रूपांतर कपि (Ape) मध्ये झाले असावे.
🔹 *गिब्बोन :*
(पृष्ठ क्र.9 ओळ क्र.15)
आग्न्येय आशियात आढणारे मध्यम बांध्याचे कपि म्हणजेच गिब्बोन्स होत. आफ्रिकेतून आशियामध्ये पोहोचलेल्या या माकडांचे गिब्बोन्स मध्ये रूपांतर झाले असावे. यांना शेपूट नसते. माकडात नसणारे अपेंडीक्स यांच्यात आढळते. मेंदू विकसित झालेला आहे. 'गिब्बोन्स' हे माकड आणि विकसित कपि (गोरिला, चिंपाझी इ.) यांना जोडणारा दुवा आहेत.
🔹 *ओरँग-उटान:*
(पृष्ठ क्र.9 ओळ क्र.15)
हा मलाया आणि इंडोनेशियन शब्द असून ओरँग = मानव,
हुटान = जंगल; म्हणजेच *'जंगली मानव'* असा या शब्दाचा अर्थ आहे. हा कपि बोनिओ आणि सुमात्रा बेटावर आढळतो. याचे शरीर मोठ्या आकाराचे, तांबूस रंगाचे लांब केस, लांब व हुकासारखे असणारे हात-पाय झाडावर राहण्यासाठी अनुकुलित झालेले असतात.
🔹 *चिंपांझी*
(पृष्ठ क्र.9 ओळ क्र.16)
आफ्रिकन जंगलात आढळणारा हा मोठ्या आकाराचा कपी असून याचे कान मोठे आणि रंग काळा असतो. या कपिचे वैशिष्टय म्हणजे यांच्याजवळ हत्यार बनवणे आणि हाताळण्याचे विलक्षण बौद्धिक कौशल्य आढळते.
🔹 *गोरिला*
(पृष्ठ क्र.9 ओळ क्र.16)
हा प्रामुख्याने आफ्रिकन जंगलात आढळतो. गोरिला हा शब्द सर्वप्रथम एका ग्रीक प्रवाशाने आफ्रिकन जंगली, केसाळ प्राण्यांसाठी वापरला होता. चिंपांझीच्या तुलनेत गोरीलाचे शरीर किंचित पुढे झुकलेले, कान तुलनेने छोटे, मजबूत खांदे, धिप्पाड शरीरयष्टी आणि लांब हात हे यांचे वैशिष्ट आहे. यांच्या मेंदूचा इतर कपिच्या तुलनेत चांगला विकास झालेला दिसतो.
🔹 होमिनिडा गणातील माकड, कपि आणि माणूस यांचा पूर्वज गट (ancestral stock) हा एकच होता आणि कालानुरूप, उत्क्रांतीद्वारे हे सर्व एकमेकांपासून वेगळे होत गेले. या कपिगटामध्ये ‘ओरँगउटान’ हा आशियाई कपि आणि गोरिला व चिंपँझी हे आफ्रिकन कपि यांचा समावेश होतो. आजचा माणूस हासुद्धा आफ्रिकेतच उत्पन्न झाला असून चिंपँझी हा त्याचा सर्वांत जवळचा चुलत भाऊबंद आहे असे आपण म्हणू शकतो. माकड आणि नरवानर कपि (म्हणजे गोरिला, चिंपँझी, आधुनिक मानव) यांच्या शरीररचनेत बरेच साम्य असून अस्थिस्वरूपात बदल होत गेल्यामुळे त्यांच्यात हळूहळू विकास होत गेला असावा.
*विकासाचा हा क्रम:*
लेम्यूर > गिब्बोन > ओरँगउटान > चिंपांझी > गोरिला असा आहे.
[या सर्व कपींची छायाचित्रे सोबत देत आहे. ती पाहिल्यास संकल्पना आणखी स्पष्ट होईल.]
*आजचा स्वाध्याय*
पाठ्यपुस्तकातील पान नंबर 11 वर दिलेल्या स्वाध्यायातील जमतील तेवढे प्रश्न सोडवा
लेखांक- 14
💢 इयत्ता 10 वी
*विज्ञान भाग 2 : स्वअभ्यास*
प्रकरण 1 : *आनुवंशिकता व उत्क्रांती*
★★★★★★★★★
🔹 *रामापीथेकस*
(पृष्ठ क्र.9 ओळ क्र.खालून 3)
◆ *अर्थ:* पिथेकॉस म्हणजे कपी;
रामा (संस्कृत) + पिथेकॉस (ग्रीक) यावरून रामापीथेकस हा शब्द तयार झाला आहे. भारतातील शिवालिक पर्वतात प्रथम याचे अवशेष आढळले म्हणून याचे नाव रामापीथेकस पडले आहे.
◆ *आढळ*: सुमारे 12 ते 14 लाख वर्षांपूर्वी ही प्रजात अस्तित्वात असावी. आफ्रिका, शिवालिक पर्वत (सध्याचे उत्तर पाकिस्तान) रांगेत याचे अवशेष आढळून आले आहेत.
◆ *वैशिष्ट्ये* : ताठ चालणारा, गुहेत राहणारा आणि इतर कपी पेक्षा विकसित मेंदूचा हा प्राणी असावा.
🔹 *नियांडरथल मानव*
(पृष्ठ क्र.10 ओळ क्र.14)
◆ *अर्थ व आढळ:* जर्मनीतील नियांडर खोऱ्यातील गुहेत यांचे अवशेष आढळले म्हणून याना नियांडरथल मानव या नावाने ओळखतात.
◆ *वैशिष्टये:* सुमारे 50 हजार वर्षापूर्वी अस्तित्वात असणाऱ्या या 'बुद्धिमान मानवाचे' चुनखडकाच्या गुहेत अवशेष आढळले. जनुकीय, शारीरिक आणि वर्तनदृष्ट्या हा आधुनिक मानवाच्या अगदी जवळचा आदिमानव होय.
🔹 *क्रो-मॅग्नन मानव*
(पृष्ठ क्र.10 ओळ क्र.15)
◆ *अर्थ*: क्रो=गुहा, मॅग्नन=मालक
फ्रान्समधील क्रो-मॅग्नन डोंगरातील गुहांमध्ये यांचे अनेक अवशेष आढळले म्हणून यांना असे नाव मिळाले आहे.
◆ *वैशिष्टये:* सुमारे 40 ते 10 हजार वर्षापूर्वी हा आदिमानव अस्तित्वात होता. हा नियांडरथलचा समकालीन असावा. याचे मेंदू /कवटी इतरांच्या तुलनेत मोठे आहेत. होमो प्रजातीतील हनुवटी असणारा हा पहिला आदिमानव असावा.
■ *निष्कर्ष:*
रामापीथेकस, नियांडरथल मानव आणि क्रो-मॅग्नन मानव हे कपी कुलापेक्षा प्रगत आणि बुद्धिमान आदिमानव होते.
या सर्व माहितीवरून तुम्ही कोणता निष्कर्ष काढाल?
उत्क्रांतीचा प्रवास "माकड > कपी > आदिमानव > आधुनिक मानव" असा झाला आहे.
■■■
विद्यार्थी मित्रहो,
प्रकरण 1 साठी हा आजचा शेवटचा लेख. या प्रकरणातील कोणत्याही घटका संदर्भात तुम्हाला शंका असल्यास श्रीशैल मठपती सर व्हाट्सअप नंबर 9922242470 वर मेसेज करून विचारू शकता. (कृपया फोन करू नये.)
प्रकरणाच्या शेवटी दिलेला स्वाध्याय पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. उद्या एक दिवस विश्रांती घेऊन आपण लगेच दुसऱ्या प्रकरणाची माहीती घेणार आहोत.
धन्यवाद!